Pune : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून जबरी चोरी करणारी 6 जणांची टोळी गजाआड, चतुःश्रृंगी पोलिसांकडून 17.50 लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना केअर टेकर ब्युरोमार्फत काम करण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या घराची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केले आहे. सहा जणांची टोळी असून, गेल्या आठवड्यात घडलेल्या औन्ध येथील गुन्हा केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून 3 दुचाकी, सोने, हिऱ्याचे दागिने व कॅमेरा असा 17 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

संदीप भगवान हांडे (वय 25), मंगेश बंडू गुंडे (वय 20), राहुल कैलास बावणे (वय 22), विक्रम दीपक थापा उर्फ बीके (वय 19), किशोर कल्याण चनघटे (वय 21) आणि भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या आठवड्यात (दि. 25 एप्रिल) रात्री औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीत घुसून उच्चभ्रू बंगल्यातील ज्येष्ठ दांपत्याला आणि त्यांच्या कुकला चाकूचा धाक दाखवून 15 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यावेळी या आरोपीची माहिती मिळाली. त्यांची माहिती काढत असताना ते औरंगाबाद, जालना, आणि नाशिक अशा विविध ठिकाणी असल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली. तर यापूर्वीचा देखील 1 गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आला आहे.

सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद, जालना आणि पुण्यात असे यापूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत. ते आधी केअरटेकर म्हणून संबंधित घरात जाऊन घराची रेकी करत आणि त्यानंतर दरोडे टाकत असल्याचे समोर आले आहे. संदीप हांडे हा जालना येथील एका दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे.
ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक मोहन जाधव, कर्मचारी मुकुंद तारु, श्रीकांत वाघवले, प्रकाश आव्हाड, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर मुळे, सुधाकर माने, जारवाल यांच्या पथकाने केली आहे.

केअर टेकरचे व्हेरिफिकेशन करा…

शहरातील नर्सिंग ब्युरो चालवणाऱ्या केअर टेकर फर्मच्या चालकांनी नवीन मुले कामाला ठेवताना त्यांचे व्हेरिफिकेशन करण्याचे सूचना केल्या आहेत. तसेच जेष्ठ नागरिक व पुणेकरांनी ब्युरो मार्फत मुले ठेवताना त्यांची पूर्ण माहिती व खात्रीकरूनच ठेवावे, असे आवाहन परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.