Pune : लॉकडाऊन कधी संपणार? अजित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी जिल्ह्यातील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन संदर्भात येत्या 10 दिवसांतील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पुण्यात रुग्णांची संख्या कमी झाली, मात्र जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे संख्या कमी झालेली नाही. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. रुग्णांना आता ऑक्सिजन, व्हेंटिलेटरच्या खाटांची कुठेही अडचण येत नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील कोरोना स्थितीच्या आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, पुणे शहरातील रुग्णांची संख्या कमी होत आहे, परंतु जिल्ह्यातील रुग्णांची संख्या हवी तेवढी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय लगेच घेतला जाणार नाही. पुढील दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा अंदाज घेतला जाईल आणि त्यावेळी लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितेल.

अजित पवार पुढे म्हणाले, पुण्यात काळ्या बुरशीमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या तीनशेच्या वर आहे. पुण्यामध्ये बाहेरून रुग्ण पुण्यात येत आहे. या आजारावरील उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची कमतरता आहे. हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आला होता, असेही अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील गुंडांच्या अंत्यविधीला मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात संबंधित ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारे चुकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई टाळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.