Pune : व्हेंटिलेटरसाठी वयोमर्यादा जाहीर करा, मनसेची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुण्यातील रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड मिळवताना धावपळ करावी लागत आहे. तसेच हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर बेड असून देखील गंभीर रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. लाखो रुपये डिपॉझिट घेऊन हे बेड रिक्त ठेवण्यात येत असल्याची शंका मनसेने उपस्थित केली आहे. या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटरसाठी वयोमर्यादा जाहीर करावी अशी मागणी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रशांत कनेजिया यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व व्हेंटिलेटर बेडसाठी पुणे जिल्ह्यातील रुग्णांची प्रतिक्षा यादी जाहीर करावी. तसेच व्हेंटिलेटर बेडसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा. जेणेकरुन रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळेल आणि रुग्णांचे प्राण वाचतील. सध्या पुणे महापालिकेच्या हेल्पलाईनवर व्हेंटिलेटर बेडची अपडेट माहिती मिळत नसल्याचे कनोजिया यांनी निवेदनात म्हटले आहे.

कनोजिया यांनी पुढे म्हटले की, आपण व्हेंटिलेटर बेडसाठी वयोमर्यादा निश्चित करणे गरजेचे आहे. कारण जे रुग्ण बरे होणार नाहीत त्या रुग्णांना कुटुंबाच्या हट्टामुळे आणि पैशांच्या जोरावर हॉस्पिटलमध्ये बेड अडकून पडले आहेत. अनेक रुग्णांना व्हेटिलेटरची आवश्यता नसतानाही व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याची शक्यता आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे त्वरीत पुणे जिल्ह्यातील व्हेंटिलेटर डॉक्टरची समिती करुन ऑडिट करुन घेऊन सर्व व्हेंटिलेटर रुग्णांसाठी मेडीकल प्रोटोकॉल जाहीर करावा, अशी मागणी प्रशांत कनोजिया यांनी केली आहे.