Pune : ‘माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतोस काय, जनता वसाहतीचे भाई आम्हीच’; राडा प्रकरणी दत्तवाडीत खुनाच्या प्रयत्नासह 2 वेगवेगळे गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे पोलीस आयुक्त गुन्हेगारी कमी करण्यासाठी मोक्काची कडक कारवाई करत डांगडींग करणाऱ्या नामांकित अन बड्या भाईंना जेलवारी घडवत असताना गुन्हेगारीचे माहेर घर असणाऱ्या जनता वसाहतीत मात्र नव्याने उदयास आलेल्या “दादा”नी परिसर दहशतीने काबीज करण्यास सुरुवात केली आहे. ‘माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतोस काय, जनता वसाहतीचे भाई आम्हीच’ असे छातीठोक सांगत 8 जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने सपासप वार केले आहेत. तर दुसऱ्या गटाने देखील याप्रकरणानंतर शेजारच्या गल्लीत तुफान गोंधळ घालत वाहनांची तोडफोड करत एका महिलेवर देखील वार केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जनता वसाहत भीतीच्या छायेखाली आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह इतर कलमानव्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील गुन्हे दाखल झालेले बहुतांश अल्पवयीन मुले आहेत. फिर्यादी समीर शिवतरे आणि त्याचा मित्र संकेत लोंढे हे जनता वसाहतीतील गल्ली नंबर 25 येथील विठ्ठल मंदिर परिसरात थांबले होते. यावेळी जनता वसाहतीमधील कुविख्यात गुन्हेगाराचा (त्याचा टोळी वर्चस्व वादातून दोन वर्षांपूर्वी गोळ्या झाडून आणि कोयत्याने सपासप वार खून झाला आहे) अल्पवयीन मुलगा आला. त्याने फिर्यादी व त्याच्या मित्रांना ‘माझ्या एरियात येऊन भाईगिरी करतो काय, इथला भाई फक्त मीच आहे’ असे म्हणत या तरुणाला फरपटत दुसऱ्या गल्लीत नेले. त्याठिकाणी लोखंडी कोयत्याने त्याच्या डोक्यात, दोन्ही हातावर आणि पायावर सपासप वार केले. तसेच “आम्हीच जनता वसाहत भाई” आहोत असे म्हणून दहशत निर्माण केली. अचानक झालेल्या या प्रकरणाने नागरिकांची मात्र धावपळ उडाली.

हे प्रकरण शांत होत नाही तोवर फिर्यादी समीर शिवतरे याचे मित्र त्याठिकाणी आले. समीरला रुग्णालयात घेऊन जात असताना या 9 ते 10 जणांच्या टोळक्याने जबरदस्त गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गल्ली नंबर 26 मध्ये हातात कोयते घेऊन गोंधळ घालत असतानाच पार्क केलेल्या एका वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहन असणारी महिला मध्ये आली. तिने अडविण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी तिच्यावरच कोयत्याने वार केले. सुदैवाने महिलेने तो वार चुकवला. पण नंतर या आरोपींनी दशहत माजवत वाहनांची तोडफोड केली आणि पहिल्या टोळक्याकडून शांतता होत नाही तोवर पुन्हा या दुसऱ्या टोळक्याने दहशत निर्माण केली.

अचानक झालेल्या या प्रकाराने मात्र येथील नागरिकांनी पळापळ सुरू झाली होती. यानंतर मात्र नेहमीप्रमाणे माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी धाव घेतली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत. एकीकडे पोलीस आयुक्त गुन्हेगारी कमी करण्यास जीवाचे रान करत असताना दुसरीकडे या नव्याने उदयास आलेल्या दादांनी मात्र गुन्हेगारीची दहशत कायम ठेवली आहे.