…अन् २ लाखासाठी पुण्यातील वकिलावर फायरिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीच्या वादासंदर्भातील खटला लढण्यासाठी दिलेल्या 2 लाखाच्या फीसच्या कारणावरून पुण्यातील वकिलावर गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्‍न झाले. दरम्यान, शहर गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाने केवळ 16 तासाच्या आत गुन्हयाची उकल केली असुन गोळीबार करणार्‍याला अटक केली आहे तर त्याच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले आहे.

वकिल

वकिलावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार

कुरमादास बडे (32, रा. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आणि त्याच्या साथीदाराने अ‍ॅड. देवानंद रत्नाकर ढोकणे (42, रा. कामराजनगर येरवडा) यांच्यावर सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरातील संगमवाडी येथे गोळीबार केला होता. गोळीबारात अ‍ॅड. ढोकणे हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालु आहेत. जमिनीवरून बडे आणि त्याच्या आत्याचे वाद चालु होते. त्यासंदर्भात बडेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात खटला लढण्यासाठी त्याने अ‍ॅड. ढोकणे यांचा वकिलपत्र दिले होते. फीस म्हणून बडेने अ‍ॅड. ढोकणे यांना 2 लाख रूपये दिले होते. दरम्यान, बडे आणि त्याच्या आत्यामधील चालु असलेले जमिनीचे वाद न्यायालयाच्या बाहेरच मिटले. अ‍ॅड. ढोकणे यांच्या सल्ल्यानुसारास त्यांचे वाद मिटले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, बडेला हे मान्य नव्हते. तो वेळावेळी फोन करून तसेच प्रत्यक्षात भेटुन अ‍ॅड. ढोकणे यांना दिलेली फीस परत मागत होता. त्यास अ‍ॅड. ढोकणे यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपी बडेने त्यांना बार असोसिएशनकडे तक्रार करण्याची धमकी देखील दिली होती. फीस पोटी घेतलेले 2 लाख रूपये अ‍ॅड. ढोकणे हे परत देणार नसल्याची खात्री पटल्यानंतर बडेने त्यांच्यावर गोळीबार करण्याचे ठरवले. सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास बडे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने दुचाकीवरून अ‍ॅड. ढोकणे यांना संगमवाडी परिसरात गाठले. अ‍ॅड. ढोकणे हे त्यांच्या चारचाकीमधुन जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला.

पुण्यातील येरवडा परिसरात वकिलावर गाेळीबार

वकिलावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली होती. गुन्हे शाखेचे पोलिस रात्रभर प्रकरणाची माहिती घेतले होते. दरम्यान, अ‍ॅड. ढोकणे आणि त्यांचा पक्षकार बडे यांच्यावर कुठल्यातरी कारणावरून वाद चालु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी प्रकरणाची आणखी माहिती घेतली. अ‍ॅड. ढोकणे यांच्यावर बडे आणि त्याच्या साथीदारानेच गोळीबार केल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याची मोहिम उघडण्यात आली. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, उपनिरीक्षक दिनेश पाटील, कर्मचारी सचिन जाधव, रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, प्रशांत गायकवाड, इमरान शेख, तुषार माळवदकर आणि सुधीर माने यांच्या पथकाने आरोपी कुरमादास बडेच्या मुसक्या आवळल्या तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. बडेला अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.

जाहिरात