Pune : बॉडी बिल्डर तरुणांना उत्तेजनासाठी औषध विक्री, गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बॉडी बिल्डर तरुणांना उत्तेजनासाठी औषध विक्री करताना एकाला गुन्हे शाखेने पकडले आहे. धक्कादायक म्हणजे, हे औषध लो – बीपी आणि इतर गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते. त्याच्याकडून उत्तेजक द्रव्याच्या १६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. रोहन प्रल्हाद लोंढे (वय २९,रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिम करणाऱ्या तरुणांना लोंढे उत्तेजकाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली होती. शंकरशेठ रस्त्यावर तो औषधाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे कर्मचारी रेणुसे यांना समजले. त्यानुसार पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून ‘मेफेंटाइनरमाइन सल्फेट’ या उत्तेजकांच्या १६ बाटल्या जप्त केल्या.

लोंढेला ताब्यात घेण्यात आले. यानंतर ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) दिली. जप्त केलेल्या या औषधाचा वापर हृदयविकार तसेच लो-बीपी असलेले रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जातो. ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगताप व त्यांच्या पथकाने केली आहे.

देशात लॉकडाऊन झाल्यापासून जिम बंद आहेत. राज्य शासनाने दसऱ्यापासून (२५ ऑक्टोबर) जिम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात आता हा नवीन प्रकार समोर आला आहे. यामुळे या तरुणांचे प्रबोधन करावे, तसेच उत्तेजकांचा वापर करू नये. त्याचा वापर शरीरासाठी घातक असल्याची माहिती प्रशिक्षकांनी द्यावी, असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे.