Pune : हजारो कचरा वेचकांची केंद्रीय विमा योजना 4 वर्षांपासून ‘खंडित’ ! कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणार्‍यांकडे मनपाचे ‘दुर्लक्ष’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या साथीमध्ये शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडताना मरण पावलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अद्याप कुठलिही भरपाई मिळालेली नाही. तर दुसरीकडे शहरात अगदी झोपडपट्टयांपासून सोसायट्यांमध्ये जावून घरोघरी कचरा गोळा करणार्‍या स्वच्छ संस्थेकडील सुमारे साडेसात हजार कचरा वेचकांचा महापालिकेने चार वर्षांपासून विमाच उतरविला नसल्याचे समोर आले आहे. स्वच्छता अभियानात पुण्याचे नाव देशात अव्वल येण्यासाठी कष्ट उपसणार्‍या स्वच्छतादूतां प्रति महापालिका आणि केंद्र शासन उदासीन असल्याचा प्रकार यातून समोर येत आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांतून ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून स्वच्छ संस्था व अन्य काही संस्थां शहरात काम करत आहेत. आजमितीला शहरातील ७५ टक्के घरांतून कचरा गोळा करण्यासाठी ८ हजारांहून अधिक स्वच्छता सेवक कार्यरत आहेत. यापैकी जवळपास ९० टक्के कर्मचारी हे स्वच्छ या संस्थेचे आहेत. अगदी कोरोनाच्या काळात लॉकडाउनमध्येही ही सेवा देणारे स्वच्छचे चार कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे.

कचरा वेचकांना ग्लोव्हज, रेनकोट, साबण तसेच ढकलगाड्या व बकेट पुरविण्याचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येते. स्वच्छ संस्थेच्यावतीने वेळोवेळी त्यांच्याकडील कर्मचार्‍यांच्या आरोग्य तपासण्याही केल्या जातात. या कर्मचार्‍यांचा केंद्र शासनाच्यावतीने एक लाख रुपयांचा विमाही उतरविण्यात येतो. परंतू २०१६ पासून ही विमा योजना तांत्रिक अडचणीत सापडली आहे. २०१६ पासून स्वच्छ संस्थेच्या कर्मचार्‍यांचा विमा उतरविण्यात आलेला नाही. यामुळे अगोदरच गरिबीमुळे कचरा वेचण्यासारख्या घाणीतील कामाकडे वळालेला हा वर्ग दुहेरी कात्रीत सापडला आहे.

केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत कचरा वेचकांचा विमा उतरवण्याची योजना तांत्रिक कारणामुळे खंडीत झाली आहे. नुकतेच ती पुन्हा सुरू करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या मार्ङ्गत महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

– ज्ञानेश्‍वर मोळक (सह आयुक्त आणि घन कचरा विभाग प्रमुख, पुणे महापालिका)