24 टक्के व्याजाच्या आमिषाने 95 लाखाची फसवणूक, दोघे अटकेत तर एकजण फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एरंडवणा परिसरातील पलाश हेल्थ केअर सिस्टीम प्रा. लि. कंपनीत पैसे गुतविण्यास सांगत त्याबदल्यात वर्षाला 24 टक्के लाभांश देण्याचे बहाण्याने तिघांची तब्बल 95 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. डेक्कन पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.

नरेंद्र पोपट बोर्‍हाटे (वय 58) व संतोष दत्तात्रय सावंत (वय 45, रा. एरंडवणा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बाणेर परिसरातील एका मोठ्या आयटी कंपनीत नोकरीस आहेत. त्या राहण्यास कोथरूड परिसरात आहेत. त्यांची व आरोपींची चांगली ओळख होती. दरम्यान, आरोपींनी त्यांना आमच्या कंपनीत भांडवलाची गरज असून, तुम्ही पैसे गुंतविता का, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादींनी पैसे गुंतविल्यास त्याचा मला फायदा काय, असे विचारले. त्यावर त्यांनी तुम्हाला 24 टक्के लाभांश देतो, असे सांगितले.

मात्र, नंतर आरोपींनी त्यांना सतत संपर्ककरून त्यांना कंपनीत पैसे गुंतविण्यास सांगितले. सतत पाठपुरावा केल्याने फिर्यादींचा विश्वास बसला. त्यांनी 70 लाख 56 हजार रुपये गुंतविले. तर, इतर दोघांनी 25 लाख असे एकूण 95 लाख 56 हजार रुपये गुंतवणूक केली. परंतु, ठरल्याप्रमाणे त्यांना 24 टक्के लाभांश न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखलकरून दोघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.