ई-मेलद्वारे एक्सपोर्ट कंपनीची सव्वा दोन लाखाला फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वेगवेगळ्या देशात औषध पुरवठा करणार्‍या एका एक्सपोर्ट कंपनीचा इमेल अ‍ॅक्सेसकरून त्याद्वारे कंपनीला सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जून ते जुलै 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी निखील अनगळ (वय 35, रा. शिवाजीनगर) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात बँक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची आर्शिवाद एक्सपोर्ट नावाने फर्म आहे. त्यांच्या फर्ममार्फत वेगवेगळ्या देशातील नागरिकांना औषध पुरवठा केला जातो. तसेच, अनेकांकडून औषधेही खरेदी करतात. विद्यापीठ गेटसमोरील परिसरात त्यांची कार्यालय आहे.

औषध खरेदी करणार्‍या ग्राहकांची बिल हे फिर्यादींच्या इमेलवर येतात. दरम्यान, जुन महिन्यात त्यांचा इमेल अज्ञाताने अ‍ॅक्सेस केला. तसेच, त्यांचे ग्राहक व सप्लायर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर 2 लाख 31 हजार रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.