Pune Collector Dr Suhas Diwase | आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत नियोजन करा – डॉ. सुहास दिवसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Collector Dr Suhas Diwase | आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. सर्व संबंधित विभागाने नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर, शास्त्रज्ञ डॉ. मेधा खोले, एनडीआरएफचे दीपक तिवारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित करुन त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी. त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावे आदीबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग तसेच नागरिकांना माहिती द्यावी. पूरबाधित गावाच्या अनुषंगाने आपत्कालीन यंत्रणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व विभागांच्या समन्वयाने सज्ज ठेवावी.

आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल, याबाबत नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे, साधनसाहित्य तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत स्वतंत्रप्रणाली विकसित करावी. मान्सून काळात सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन पुरेसा सर्पविष प्रतिबंधक लस साठा उपलब्ध ठेवावा. कृषी विभागाने खरीप हंगामात पेरणीची वेळ लक्षात घेता आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करावी.

पुणे महानगर व पिंपरी चिंचवड महानगर पालिकाक्षेत्रात मेट्रो रेल्वेमार्गिकेच्या व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. नदीपात्र तसेच रस्त्याच्या बाजूस मेट्रो रेल्वेमार्गिकेच्या कामांमुळे निर्माण होणारा मलबा लवकरात लवकरात काढून घेण्याची मेट्राने कार्यवाही करावी. पवना नदीपात्रात असलेली अतिक्रमणे, मलबा काढण्याची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करावी. दोन्ही महानगरपालिकाक्षेत्रात पावसाळ्यात कोसळणारी झाडे, मार्गिकेच्या बाजूस असणारा कचरा, झोपडपट्टीतील कचरा काढून घेण्याची कार्यवाही करावी.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर लक्षात घेता सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. भीमा नदीच्या पात्राच्या परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील याकरीता परिसरातील मलबा काढण्याची कायवाही करावी. दौंड आणि नीरा- नरसिंगपूर येथे पूरपरिस्थिती निर्माण होते त्यामुळे पाटबंधारे, महसूल, पोलीस आदी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची तुकडी पुणे जिल्ह्यात असणे ही आपल्यादृष्टीने मोठी मोलाची बाब असून वेळोवेळी त्यांच्याकडून विविध विभागांनी प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणेने सामाजिक जाणीव ठेवून संवेदनशील राहून कामे करावे, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.

पाटील म्हणाले, मान्सून काळात हवामान खाते, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने कामे करावीत.

होसाळीकर म्हणाले, हवामान खात्याने १५ एप्रिल रोजी पर्जन्यमानाबाबत पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर केला. यानुसार सुमारे १०६ टक्के पर्जन्यमान होणार असून तो सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान आहे. उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने हवामान विभागाचा इशाऱ्याची वाट न पाहता आपल्या परिसरात ४० सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास नागरिकांनी खबरदारी घ्यावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभाग किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन होसाळीकर यांनी केले.

यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने करीत असलेल्या तयारीबाबत माहिती दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार