पुणे जिल्ह्यात लॉकडाउन ? व्हायरल Video वर जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘ही अफवा, कोणीही विश्वास ठेवू नये’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. परिस्थिती आटोक्यात राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) आदेश जारी केले आहेत. दरम्यान जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शनिवारी (दि. 20) व्हायरल झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु ही अफवा आहे. त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना आदेश दिले आहेत. मात्र, नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, शाळा-महाविद्यालये, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणी निर्बंध कठोर केले आहेत. मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.