पुण्यात आज रात्रीपासून कडक निर्बंध, 31 मार्चपर्यंत शाळाही राहणार बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  दिवसेंदिवस पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर येथे लॉकडाऊन लागू केला नसला तरी कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी (दि. 12) रात्रीपासून केली जाणार आहे. तसेच येत्या 31 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या निर्बंधांनुसार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्यात येणार आहेत. तसेच एकूण ते क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच त्यांना सेवा देता येणार आहे. पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी राहणार आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणच्या बागा संध्याकाळी बंद राहणार आहेत. कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त जणांना सहभागी होता येणार नाही. मॉल्स आणि सिनेमागृह रात्री 10 वाजताच बंद होतील. तसेच टपरी किंवा सार्वजनिक रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना उभे राहता येणार नाही. लायब्ररीमध्ये देखील 50 टक्के क्षमतेने लोकांना जाता येणार आहे. या दरम्यान ऑफिसेमधील कामकाज त्यांच्या वेळेनुसार सुरू राहणार आहेत.