पुण्यातील ‘त्या’ पोलीस ठाण्यातील सर्वांचीच ‘कोरोना’ची टेस्ट होणार, आयुक्तांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहीती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम यांनी दिली. दरम्यान या पोलीस ठाण्यात 4 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांच्या निर्णयामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

शहरात 30 पोलीस ठाणी आहेत. दरम्यान मध्यवस्तीत पाच ते सहा पोलीस ठाणी येतात. शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा मध्यवस्तीत झाला आहे. पुणे पोलिस दलातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच पोलीस ठाण्यातील हे कर्मचारी आहेत. हे पोलीस ठाणे मध्यवस्तीत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पोलीस ठाण्यातील २० जणांना क्वारंटाइन केले आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांची कोरोना चाचणी करावी, अशी चर्चा दबक्या वाजत सुरू होती. तत्पुर्वी सुरक्षिततेसाठी सर्वांना सॅनिटायझर, फेस शिल्ड मास्क, पीपीइ किट देण्यात आले आहे. त्यानंतर आता या सर्वांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

—चौकट—

पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून 24 तास काम करत आहेत. त्यांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी प्रशासनावर आहे. त्यादृष्टीने शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या आणि बाधित रुग्ण आढळलेल्या पोलीस ठाण्यातील सर्वांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर काम सुरू करण्यात आले आहे.

– डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त