पुण्यात ‘कोरोना’ हरवण्यासाठी तरुणांचा निश्चय ! उपनगरामध्ये जनता कर्फ्यू तरीही मूळ उद्देशाला ‘फाटा’

पुणे : प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग घालविणे जमणार नाही, असा विचार करण्यापेक्षा आपण कोरोनाला हरवूच असा निश्चय करू. कोरनावर मात करूनच दाखवू असा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे, अशी भूमिका पोक्तमंडळींनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमध्ये आपणही सहभागी होऊ आणि कोरोनामुक्त देश करण्यासाठी एकजुटीने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचा दृढ निश्चय तरुणांनी केला असल्याचे दिसत आहे.

मागिल महिन्यापासून देशभर लॉकडाऊनमुळे प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर वाहनांची नाही, तर नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. उपनगर आणि परिसरातील सोसायटी आणि गल्लीतील रस्ते नागरिकांनी स्वतःच काठ्या, झाडांच्या फांद्या लावून बंद केले आहेत. ही जमेची बाजू असली तरी, मात्र, गर्दी टाळा या मूळ उद्देशाला फाटा दिला जात असल्याचे दिसत आहे.

पुण्याच्या पूर्व भागातील वानवडी, हडपसर, रामटेकडी, वैदूवाडी, केशवनगर, मुंढवा, मांजरी, साडेसतरानळी, शेवाळेवाडी, फुरसुंगी, भेकराईनगर, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती, उरुळी कांचन, मंतरवाडी आदी भागातील नागरिकांनी स्वतःच जनता कर्फ्यू पाळला आहे. तसेच गल्ली, डीपी रस्ते, सोसायट्यांचे रस्ते लाकडी बांबू, तुटके सिमेंटचे पाईप लावून बंद केले आहेत. मात्र, हे करीत असताना सोसायटी आणि गल्लीत अनेक नागरिक गर्दी करताना दिसत आहेत, ही बाब कोरोना व्हायरसच्या संसर्गासाठी पोषक आहे. त्यामुळे गर्दी टाळणे हे सर्वांच्याच हिताचे आहे.

सोसायट्या आणि गल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत पत्ते, क्रिकेट, कॅरम, फुटबॉल असे खेळ, तसेच घोळक्याने कोरोनाविषयी चर्चा करताना दिसत आहेत. त्यामध्ये काही महाभाग तर तोंडाला मास्क न लावताच जोरजोरात आरोपप्रत्यारोप करीत असतात. प्रत्येकाने स्वतःबरोबर देशवासियांच्या सुरक्षिततेसाठी तोंडाला मास्क किंवा रुमाल नाही, तर टॉवेल तरी लावणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासनाकडून वारंवार या सूचना केल्या जात आहे, याची जाणीव ठेवणे क्रमप्राप्त आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाने 30 एप्रिल, तर केंद्र शासनाने 3 मे पर्यंत डॉकडाऊन केले असून, प्रत्येकाला घरात थांबा असे सांगितले आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम, तर अनेक कंपन्यांनी काम बंद ठेवले आहे. मात्र, या कालावधीमध्ये अन्नधान्य आणि जेवणाची गरज ओळखून अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या ठिकाणी वाटप आहे, तेथे आपल्याला मिळेल की नाही त्यामुळे एकच गर्दी करतात आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून जातो. त्यासाठी दानशूरांनी गरजूंची यादी तयार करावी आणि त्यांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणी गुपचूप पोहोच करणे ही आता गरज आहे.