Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2900 नवे पॉझिटिव्ह, 28 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशात आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येत 60 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 2900 नवीन रुग्ण सापडले आहेत.

पुणे महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात शहरामध्ये 12 हजार 929 स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 2900 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 35 हजार 394 इतकी झाली आहे. शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आज दिवसभरात शहरात विविध रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 28 इतकी आहे.

आज दिवसभरात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 20 रुग्ण शहरातील तर 8 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे 5 हजार 053 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढत असताना शहरामध्ये अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरामध्ये 22 हजार 524 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्यापैकी 519 क्रिटिकल असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 1245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 2 लाख 7 हजार 817 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.