Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 2579 नवीन रुग्ण, 4046 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 5 हजारांच्यावर होती. मात्र, आता नवीन रुग्णांच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज (सोमवार) दिवसभरात नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

पुण्यामध्ये गेल्या 24 तासात 2 हजार 579 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 30 हजार 210 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 61 रुग्ण शहरातील आहेत तर 18 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 6 हजार 991 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 4 हजार 046 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 3 लाख 82 हजार 518 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 12 हजार 276 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 40 हजार 701 इतकी आहे. यापैकी 1411 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 60 हजार 844 रुग्णांपैकी 7 लाख 48 हजार 870 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 98 हजार 670 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.99 टक्के आहे.