Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 2324 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम होताना दिसून येत आहे. मागील काही दिवासांपासून शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तर बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 709 नवीन रुग्ण आढळून आले असून सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्ण आढळून आले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 65 हजार 625 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 39 रुग्ण शहरातील आहेत तर 21 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 007 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 324 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 46 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9 हजार 066 स्वॅब तपासणी करण्यात आली. आतापर्यंत शहरामध्ये 24 लाख 36 हजार 446 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 10 हजार 676 इतकी आहे. यापैकी 1291 रुग्ण गंभीर आहे. तर 4005 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 92 हजार 436 रुग्णांपैकी 9 लाख 25 हजार 181 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 51 हजार 352 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 903 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.60 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.22 टक्के आहे.