Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 703 नवे पॉझिटिव्ह तर 22 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाबरोबर स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 703 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 22 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तब्बल 25 जणांचा आज पुणे शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 3808 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1117 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 53 हजार 600 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 36 हजार 492 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 13 हजार 300 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 703 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 437 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.