Pune News : पुणे शहरात दिवसभरात 311 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 493 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात शुक्रवारी (दि.25) 311 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 493 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3 हजार 103 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 387 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 226 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 161 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 597 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 481 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 77 हजार 358 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 68 हजार 280 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, नवी दिल्ली AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जगातील अनेक भागात सध्या जी परिस्थिती आहे, त्याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे. आपल्या देशातील पेशंटची संख्या कमी झालेली आहे. सध्या उतरता ट्रेंड (Downward trend) सुरु असून आपला रिकव्हरी रेट ही चांगला आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा व्हायरस हा अधिक संसर्गजन्य असला तरी यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पेशंट्सची संख्या कमी आहे. भारतामध्ये हा विषाणू दाखल झाला असला तरी होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत.