पुणे गुन्हे शाखेकडून बिटकॉईन कॅश जप्त

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – दत्तवाडी पोलीसात दाखल असलेल्या बिटकॉईन गुन्ह्यातील बिटकॉईन कॅश जप्त करण्यात पुणे गुन्हे शाखेच्या सायबर क्राईम सेलच्या पथकाला यश आले आहे. सायबर सेलने ६४ लाख किंमतीची ४५१ बिटकॉईन कॅश जप्त केली आहे. ही कॅश गुन्ह्यातील आरोपी साहील ओमप्रकाश बागला याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.

बिटकॉईन गुंतवणूकीतुन अधिक परतावा देण्याच्या अमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सायबर क्राईम सेलने १० आरोपींना अटक केली असून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठीत आहेत. या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सीक ऑडीटर म्हणून केपीएमजी यांची पोलीस आयुक्तांनी नेमणूक केली आहे.

या गुन्ह्यातील आरोपी साहील बागला याचे कडून जप्त करण्यात आलेली डिजीटल साधन सामुग्रीची फॉरेन्सीक अॅनॅलिसिस करण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे ४५१.९९९ इतके बिटकॉईन कॅश ही क्रिफ्टोकरन्सी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे मिळालेली बिटकॉईन कॅश याची अंदाजे ६४ लाख रुपयाची रक्कम आरोपीच्या बिटकॉईन कॅश व्हॉलेट अॅड्रेस मधून जप्त करण्यात आली. ही कॅश डिजीटल फॉरेन्सीक ऑडीटर यांच्या मदतीने जप्त करण्यात सायबर क्राईम सेलच्या पथकाला यश आले आहे.