पुण्यातील सतर्क नागरिकाने पाठलाग करून मोबाईल चोरट्यांना पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील गर्दीच्या ठिकाणी हातचलाखीने नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत मोबाइल चोरट्यांना बिबवेवाडी पोलिस व सतर्क नागरिकांनी पाठलाग करून पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकी व २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

मनोज यल्लाप्पा मुदगल (वय ३९)आणि धर्मा तिम्मा भद्रावती (वय २६, दोघेही रा. घोरपडी, मूळ कर्नाटक ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दोन दिवसांपुर्वी कात्रज परिसररातील सुखसागरनगरमध्ये यातील तक्रारदार रामेश्वर गायकवाड हे एका किराणा दुकानात खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या पाठीला हात लावून तुम्हाला कोणीतरी बोलवित आहे, अशी बतावणी करुन त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन पळ काढला. त्यानंतर रामेश्वर यांनी पोलिसमित्र गणेश राजापूरकर यांच्या मदतीने दुचाकीवर चोरट्यांचा पाठलाग करुन त्यांना बिबवेवाडी परिसरात पकडले. त्यांची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन मनोज आणि धर्मा यांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी शहरातील विविध भागातून २१ मोबाईल चोरीची कबुली दिली. मनोज आणि धर्मा मूळचे कर्नाटक राज्यातील असून तेथे त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वर्षभरापासून ते घोरपडीत राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, कर्मचारी डाके, कोठावळे, लोधा, शितोळे, शेलार मोरे यांच्या पथकाने केली.