पुण्यात घरफोडया करणार्‍या सराईताला अटक, पोलिसांनी केला 13 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. त्याच्याकडून २६० ग्रॅम सोने, ५५६ ग्रॅम चांदी, टीव्ही असा १३ लाखांचा ऐवज जप्त केला.
विक्रम विठ्ठलसिंग ठाकूर (वय ३२, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याशिवाय दागिने खरेदी करणारा सराफ रामचंद्र उर्फ हनुमंत दगडू मोहिते (वय ३१) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

विक्रम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ३८ गुन्हे दाखल आहेत. शहरात घरफोड्या होत असल्याने पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. यादरम्यान विक्रम ठाकूर रुपीनगर परिसरात घरफोडी करण्यास आला असता पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने कात्रज, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, बावधन, रहाटणी, चिखली परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले दागदागिने तो आटपाडीत राहणाऱ्या सराफ रामचंद्र उर्फ हनुमंतला विकत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केले. तर सखोल तपास करत असताना त्याने नेवासा, नगर, येवला येथेही दागिन्यांची विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याठिकाणी जाउन २ लाख ६७ हजार रुपये किंमतीचे ५० ग्रॅम सोने जप्त केले आहे. एकूण 15 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, अशोक माने, उमेश काटे, अजय जाधव, अश्विनी केकान यांच्या पथकाने ही कारवाई केली.