संचारबंदीचे आदेश ३१ मेपर्यंत कायम

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू केलेली संचारबंदी, वाहतूकबंदी तसेच जमावबंदीचे आदेश ३१ मेपर्यंत कायम राहणार आहेत. तर हॉटस्पॉट असणाऱ्या भागातील निर्बन्ध कायम असणार आहेत.

शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक बंदी, संचारबंदी आहे. तसेच मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जारी करण्यात आलेले आदेश ३१ मेपर्यंत शहरात कायम राहणार असल्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी कळविले आहे.

पुढील आठवड्यात मुस्लीम धर्मियांचा रमजान ईद सण आहे. तसेच महाराणा प्रताप जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती आहे. यानिमित्ताने जाहीर कार्यक्रमांना मनाई असणार आहे. तर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या आदेशातून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनी ओळखपत्र बाळगावे.

नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे. तसेच इतर भागात दुकाने ठेवण्यात येतील. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यायची आहे.