पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर होम क्वारंटाइन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. अशी माहिती वृत्तवाहीन्यांनी प्रसारित केली आहे.  पुणे शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून शहरातील कोरोना बाधितांची संख्या 18 हजाराच्या वर गेली आहे. शहरातील लोकप्रतिनीधी, पोलीस, आरोग्य कर्मचाऱी यांना कोरोनाची लागण होत आहे.

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या चालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. डॉ. दीपक म्हैसेकर हे कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसांपासून फिल्डवर सक्रीय होते. सुरुवातीपासून त्यांनी कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी, कोरोना रुग्णांची संख्या विषयाची मीडियाच्या माध्यमातून सामान्य माणसांशी संवाद साधला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जुलैपासून नवीन रुग्ण संख्या एक हजाराच्या पटीत वाढत आहे.  काल दिवसभरात जिल्ह्यात 1333 नवीन रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39835 झाला आहे. त्यामध्ये एका रात्रीत आणखी 252 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता रुग्णसंख्या 40 हजार 87 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 1098 इतकी झाली आहे.