पुण्यातील प्रसिद्ध ‘फॅशन स्ट्रीट’ला भीषण आग, शेकडो दुकाने जळून खाक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर परिसरातील प्रसिद्ध “फॅशन स्ट्रीट”ला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत शेकडो दुकानं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे. रात्री 11 वाजता लागलेली आग 16 फायर बंबच्या मदतीने दिड वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली. तर पहाटेपर्यंत कुलिंगचे काम सुरू होते.

लष्कर परिसरात एमजी रस्त्यावर हे “फॅशन स्ट्रीट” आहे. येथे छोटछोटे दुकान आहेत. मध्यवस्ती सारखी अतिशय अरुंद जागा आहे. दाटीवाटीनं दुकानं आहेत. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक येथून धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाकडे याची माहिती दिली. त्यानंतर प्रथम काही वाहने व जवान दाखल झाले. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. आगीचे स्वरूप पाहता आणखी फायर बंब बोलवण्यात आले. आगीचा रुद्र आवतार भयावह होता.

त्यातही घटनेच्या ठिकाणी पोहचण्यास अग्निशमन जवान यांना अडथळे निर्माण झाले होते. अगदी छोटे रस्ते व गर्दी यामुळे तेथे पोहचण्यास वेळ लागत होता. आग इतकी मोठी होती की, आगीच्या झळा पाहणाऱ्या तसेच शेजारील इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना देखील बसत होत्या. आग प्रचंड भडकली होती. तिच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. पण, 16 फायर गाड्या अग्निशमन दल आणि पीएमआरडीए दोन ते सव्वा दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान अग्निशमन दलाने मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली व फॅशन स्ट्रीटच्या बाहेर गाड्या थांबवत आग विझवण्याचे प्रयत्न केले. फॅशन स्ट्रीटच्या सभोवताली मोती बिल्डिंग, एम जी रोडवरील घरं, शहजहानंद अपार्टमेंट, समृद्दी अपार्टमेंट अशी मोठी लोकवस्ती आहे. त्यांनादेखील मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा बसल्या आहेत.

परिसरातील रहिवाशी आणि दुकान मालक व कामगार यांनी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी मदत करत या गर्दीवर नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशी लागली हे समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.

गेल्याच आठवड्यात (१६ मार्च) कॅम्पमधीलच शिवाजी मार्केटला आग लागली होती. तर, २०१७ मध्ये मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये पबमध्ये अग्नितांडव झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेनं फायर ऑडिट केले होते. त्यात फॅशन स्ट्रीटचा उल्लेख धोकादायक असा करण्यात आला होता. जवळपास सर्व दुकानं अनधिकृत असल्याचं जाहीर करण्यात आले होते, असे समजते.