खळबळजनक : पुण्यातील चंदननगरमध्ये महिलेवर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उघडया दरवाजावाटे आलेल्या मारेकर्‍याने गोळीबार करून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये घडली. गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. चंदननगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन प्रकरणाची कसुन चौकशी करण्याचे काम चालु आहे.
एकता ब्रिजेश भाटी (38, रा. इंद्रायणी गृहरचना सोसायटी, आनंद पार्क, चंदननगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात मारेकरी उघडया दरवाजावाटे घरात आला आणि त्याने एकता यांच्यावर गोळीबार केला अशी माहिती एकता यांचे पती ब्रिजेश यांनी पोलिसांना दिली आहे. गोळीबार झाल्याच्या आवाज आल्यानंतर सोसायटीमधील इतर रहिवाशांनी गर्दी केली. गोळीबार करून मारेकरी पसार झाल्याचे ब्रिजेश भाटी यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, खरच उघडया दरवाजावाटे मारेकरी आला होता का आणि त्याने एकता यांच्यावर गोळीबार केला का याचा सखोल तपास पोलिस करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासचे काम एक पथक करीत आहे. मारेकर्‍याचे वर्णन देखील सांगण्यात असमर्थ ठरलेल्या ब्रिजेश यांच्यावर पोलिस सखोल माहिती घेत आहेत. मात्र, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सोसायटीत येवुन गोळीबार करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, ओळखीच्याच कोणीतरी गोळीबार केला असावा असा तर्क काढला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबारानंतर ब्रिजेश भाटी यांनीच एकता यांना रूग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकता यांच्या छातीत गोळी लागली होती. प्रकरणाचा सखोल तपास चालु असून अद्याप एकता यांच्यावर नेमका कोणी गोळीबार केला हे पोलिसांच्या तपासात निष्पन्‍न झालेले नाही. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.