Pune : मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक; न्यायालयाकडून जामीनावर सूटका, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकल्याप्रकरणात वानवडी पोलिसांनी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह पाच जणांना अटक केली. न्यायालयाने या पाच जणांची जामिनावर सुटका केली आहे.

साईनाथ संभाजी बाबर (वय 40), गोरखनाथ अर्जुन इंगळे (वय 29), गणेश सखाराम बाबर (वय 39), अमोल बाळासाहेब शिरस (वय 40) आणि सतीश निवृत्ती शिंदे (वय 41) अशी अटक आणि जामिनावर सुटका झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांनी तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार 22 मार्च रोजी झाला होता.

साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आहेत. दरम्यान बाबर यांनी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात फिर्यादी या हजर नसल्याची माहिती घेऊन तेथे 10 ते 15 कार्यकर्त्यांबरोबर आले. तसेच, त्यांनी ओला, सुखा कचरा या कार्यालयात सर्वत्र टाकून ते करत असलेल्या शासकीय कर्तव्यास अडथळा आणला. तर सोशल डिस्टसिंगचे नियन न पाळत कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान बाबर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. यानंतर वानवडी पोलिसांनी साईनाथ बाबर आणि इतर चार जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. बाबर यांच्यावतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. रुपाली पाटील यांनी काम पाहिले.