Pune : ‘या’ कारणामुळं मला पुणे शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे; राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी पाठविला जयंत पाटलांकडे राजीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून शहराध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे हे पद देण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. पक्षाने तुपे यांची विनंती मान्य केल्यास चेतन तुपे यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

चेतन तुपे हे मागील अडीच वर्षापासून पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात तुपे यांनी म्हटले की, मतदारसंघात काम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून शहराध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्षाचा जनाधार व्यापक करण्यासाठी काम केले त्यातून बरंच काही शिकायला मिळाले. अनेक समस्यांची जाण व भान आले. पुढील काळात याचा मला निश्चित उपयोग होईल.

हडपसर विधानसभा मतदारसंघात पाच लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. यामध्ये शेतकरी, शेतमजूर, औद्योगिक कामगार, औद्योगिक वसाहती, झोपडपट्ट्या, टाऊनशिप्स अशा विविध घटकांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसंपर्क कायम ठेवण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. स्वहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला या पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती चेतन तुपे यांनी पत्राद्वारे जयंत पाटील यांना केली आहे