Pune : वेतन न मिळाल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे जंबो कोविड समोर ठिय्या आंदोलन

पुणे – सीओईपी च्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने ऐन दिवाळीत आंदोलन करावे लागले. अगदी सुरवातीपासूनच वादात अडकलेल्या जंबो कोविड हॉस्पिटल मागील शुक्लकाष्ठ अद्याप संपले नसल्याचे समोर येत आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य शासन आणि महापालिकेच्या सहकार्यातून हे जंबो कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वी हे हॉस्पिटल सुरू झाले. सुरवातीला लाईफलाईन या संस्थेला येथील व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु ढिसाळ नियोजनामुळे अवघ्या आठ दिवसांत या संस्थेचे काम काढून दुसरी संस्था नेमण्यात आली.

यानंतर काही दिवस यंत्रणा व्यवस्थित राबली. मात्र रुग्णसंख्या घटू लागल्यानंतर अगदी डॉक्टरांपासून शेवटच्या सफाई सेवकापर्यंत वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली. वेळेत पैसे मिळत नसल्याने काही डॉक्टर काम सोडून गेले. तर अन्य स्टाफ लाही कमी वेतनात काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू केला. अशातच ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्याप न झाल्याने वॉर्डबॉय, सफाई सेवक, मृतदेह पॅकिंग करणारे कर्मचाऱ्यांनी वेतनाची मागणी सुरू केली. दिवाळी सुरू होण्यापूर्वी वेतन मिळावे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या 70 ते 80 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. यामुळे हे कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी आज संध्याकाळी आंदोलन केले. ऑक्टोबर व नोव्हेंबर मधील आजपर्यंत केलेल्या कामाचे वेतन द्यावे यासाठी या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल बाहेर ठिय्या मांडला होता. परंतु त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले. उद्या सकाळी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.