Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई, 1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करुन बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल 278 गुन्हे दाखल करुन 1 कोटी 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये तीन दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे. जिल्ह्यमध्ये 746 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान आणि 18 जानेवारीला निकाल जाहिर करण्यात येणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी पथके नेमली आहेत.

यासंदर्भात विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले की, निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 278 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 167 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये 1 कोटी 35 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे तीन दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे. 14 जानेवारीला मतदानाच्या अगोदरचा दिवस 15 जानेवारी मतदानाचा दिवस आणि 18 जानेवारी मतमोजणीचा दिवस, या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बिअर बार बंद ठेवण्यात येणार आहेत. निवडणुका नसलेल्या परिसरातील दुकाने आणि बिअर बार सुरु राहणार असल्याचे झगडे यांनी स्पष्ट केले.