हडपसर येथून बेपत्ता झालेल्या तरूणाचा खून, मित्रानेच खून केल्याचे उघड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – हडपसर पोलिस ठाण्यात तरूण बेपत्ता झाल्याची घटना मे महिन्यात दाखल झाली होती. त्या तरूणाचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासामध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी खून करणार्‍या त्याच्या मित्राला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक केली आहे.

विशाल उर्फ विक्की राजु पिल्ले (वय २४, रा. हिंगणेमळा, हडपसर) याच्या खून प्रकरणी विक्की अशोक रणदीवे याला अटक करण्यात आली आहे. दि. १० मे रोजी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विशाल हा बेपत्ता झाल्याबाबत त्याचा भाऊ चेतन नाजु पिल्ले याने फिर्याद दिली होती. त्यानुसार बेपत्ता झाल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान १५ मे रोजी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॅनोलमध्ये एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह वाहत आला होता. त्यानंतर १८ मे रोजी चेतन याला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आल्यानंतर त्याने हा मृतदेह विशालचाच असल्याचे सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस नाईक मोहसीन शेख यांना विशाल याचा खून त्याचा मित्र रणदिवे याने दारू पिताना झालेल्या वादातून केल्याची माहिती मिळाली. त्यानेच पुरावा नष्ट करण्यासाठी विशालचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रताप शेळके, कर्मचारी किशोर वग्गु , मोहसीन शेख यांनी रणदिवेच्या हालचालीवर पाळत ठेवली असता त्याच्या हालचालीही संशयास्पद आढळून आल्या. त्याला तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असता त्यानेच विशालचा गळा दाबून खुन केल्याचे कबूल केले.

खून झालेला विशाल आणि आरोपी रणदिवे हे दोघेही मित्र आहेत. दि. १० मे रोजी रेल्वे रूळाच्या पलीकडे नाल्याच्या बाजुला ते झाडाखाली दारू पित बसले होते. त्यावेळी दोघांच्या वाद झाले. याच रागाच्या भरात हा खून झाला. त्यानंतर आरोपी घरी गेला. घरून परत रात्री उशीरा घटनास्थळावर गेला. विशालचा मृतदेह त्याने विगो गाडीवर ठेवून हडपसर ससाणेनगर येथील कॅनॉलवर जाऊन तो टाकून दिला.

अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप गुन्हे शाखा युनिट २ यांच्या पथकाने ही कारवाई केली.