Pune : हडपसर पोलिसांकडून मोक्कातील आरोपीला अटक, तब्बल 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्कामधील फरारी आणि औंध पोलिसांना धमकावून पळून जाणाऱ्या दोन सराईतांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 18 लाख 17 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या 24 तासांत हडपसर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी सांगितले.

सनिसिंग पापासिंग दुधानी (वय 22, रा. गल्ली नं.5, बिराजदारनगर, श्री साई सोसायटीसमोर, हडपसर, पुणे) आणि सोहेल जावेद शेख (वय 21, रा. गोसावीवस्ती, हनुमान मंदिरासमोर, बिराजदारनगर, हडपसर पुणे) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सौरभ माने व पोलीस अंमलदार 13 एप्रिल रोजी रात्री अडीचच्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी पोलीस शिपाई नाईक समीर पांडुळे आणि प्रशांत टोणे यांना दुधानी आणि शेख दोन्ही आरोपी बिराजदारनगर येथील कालव्याजवळ फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली, त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरून जाताना दिसले. पोलिसांना पाहताच आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने पाठलाग करून दोघांना पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी हडपसर, कोरेगाव पार्क, भोसरी, चाकण, कोंढवा आदी परिसरामध्ये घरफोडी, वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार घरफोड्या, चार चारचाकी कार, तीन दुचाकी असे 12 गुन्हे केल्याचे तपासात कबुल केले. आरोपीकडून अधिक गुन्हे उघड येण्याची शक्यता असून, त्यांच्या साथीदारांचा पोलीस तपास करीत आहेत.

सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक नितीन मुंडे, समीर पांडुळे, अविनाश गोसावी, पोलीस शिपाई अकबर शेख, प्रशांत टोणपे, शाहीद शेख, प्रशांद दुधाळ, निखील पवार, शशिकात नाळे, सचिन जाधव, सैदोबा भोजराव, संदीप राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, सनिसिंग पापासिंग दुधानी याच्यावर 68 गुन्हे, तर सोहेल जावेद शेख याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. दोघेही मोक्कातील आरोपी असून, औंध पोलिसांना धमकावून फरार झाले होते. वाहनचोरी करून त्या वाहनांचा वापर घरफोडीसाठी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. आरोपीचे साथीदारांचा तपास सुरू असून, आणखी गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येतील, असे त्यांनी सांगितले.