Pune : वैदूवाडी येथील वाहतूक शाखेजवळील कालव्यातील दुर्गंधीने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : सोलापूर रस्त्यावरील वैदूवाडी चौकामध्ये कालव्यात प्रचंड कचरा साचला आहे. येथील पुलाखालील पाइपांना अडकून मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असल्याने वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कालव्यातील कचरा स्वच्छ करावा, तसेच कालव्यात कचरा टाकणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र, अद्याप स्वच्छता केली गेली नाही.

दौंड-इंदापूरमधील शेतकऱ्यांना खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यामध्ये कचऱ्याबरोबर मृत व्यक्तींबरोबर जनावरे वाहून येत वैदूवाडी वाहतूक शाखेच्या जवळील पुलाखालील पाईपला अडकतात. कालव्यालगतचे नागरिकही मोठ्या प्रमाणावर कचरा कालव्यात टाकतात. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने कचरा, मृत जनावरांसह बुडून आलेल्या मृत व्यक्तीही येथे अडकतात. मागिल आठवड्यात या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्ती बाहेर काढली होती. पालिका आणि पाटबंधारे प्रशासनाने कालव्याची स्वच्छता करून कालव्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, साहसी फाऊंडेशनच्या अध्यक्षा मयुरी बामणे म्हणाल्या की, मागिल आठवड्यात गोसावीवस्ती येथे कालव्यात पडलेल्या रिक्षासह पाच चिमुकल्यांना स्थानिक युवकांनी वाचविले. ठिकठिकाणी कालव्याची संरक्षक जाळी तुटली आहे, कालव्याच्या बाजूने बनविलेला रस्ता नादुरुस्त झाला आहे, त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याप्रकरणी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे, मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही, असे त्यांनी सांगितले.