Pune : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, महिला पोलिस हवालदाराचा फ्लॅट फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या सत्र सुरू असताना आता चोरट्यांचे धाडस पोलिसांची बंद घरे देखील फोडण्यापर्यंत गेले असून, विविध भागात काल 5 फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. यात एका महिला पोलीस हवालदाराचा देखील फ्लॅट फोडला आहे. फरासखाना, विश्रामबाग कोंढवा व अलंकार या भागात या घटना घडल्या आहेत. यामध्ये दीड लाखांचा ऐवज चोरी झाला आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार कावेरी दोरगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बंद फ्लॅट फोडून चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्या शेजारी असणारा एक फ्लॅट देखील चोरट्यानी फोडला आहे. यात चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही. पण पोलिसांची घरेच चोरटे लक्ष करत असल्याने सर्व सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोरगे या राहण्यास शिवाजीनगर परिसरात आहेत. त्यांचा एक फ्लॅट कोंढवा परिसरात आहे. तो बंद आहे. मात्र चोरट्यांनी बंद दिसताच त्यांचा फ्लॅट फोडून आत प्रवेश केला. पण राहण्यास कोणी नसल्याने त्यांच्या हाती काही लागले नाही. कोदरे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा देखील बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

महावीर जैन (वय 40, सोमवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जैन यांचे दारुवाला पुलाजवळ ज्युनिअर किड्स नावाने दुकान आहे. दरम्यान दुकान बंद केले असता अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून 12 हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे.

तर दुसरी घटना विश्रामबाग येथे घडली आहे. यात 1 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबत संज्योत कोंढरे (वय 35) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पीएमसी कॉलनीत राहण्यास आहेत. कामानिमित्त ते रात्री घराला कुलूप लावून गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच 1 लाख 46 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. मंगळवारी सकाळी फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच कर्वे रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू वसाहतीत राहणारे दीपक शेडगे यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे. याप्रकरणी आलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करून 5 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. काल सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.