Pune : घरघुती वादातून पतीकडून पत्नीचा डोक्यात तवा मारून खून, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरघुती वादातून पत्नीच्या डोक्यात तवा मारून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

कला आदिनारायन यादव (वय 30, रा. मांजरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कला आणि त्यांचा पती दोघेही मांजरी येथील केशवनगर रोडवर भाड्याच्या घरात राहात होते. मोलमजुरी करून ते आपली गुजराण करत होते. दरम्यान, त्यांच्यात घरघुती कारणावरून वाद होते. आज सकाळीदेखील त्यांच्यात वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आदिनारायण याने पत्नी कला यांच्या डोक्यात चुलीवरचा तवा मारून त्यांचा खून केला. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर तो घरातच थांबला होता. शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर हडपसर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीला ताब्यात घेतले आहे.

You might also like