Pune : उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकाना देखील बंदी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – प्रथमच पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभुमीवर न ढोल-ताशांचा आवाज न डिजेच्या ठेक्या विना पार पडत असून, उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकाना देखील बंदी असणार आहे. तरीही पुणे पोलीस पूर्ण खबरदारी घेत असून, उद्यासाठी त्यांनी नागरिकांना विसर्जनास बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. तर सुरक्षेच्या कारणास्तव 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसानी घाट, मानाचे गणपती परिसरात जास्त बंदोबस्त ठेवला असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तर पुणेकरांनी देखील घरगुती गणपतीचे सोसायटीत विसर्जन करून सहकार्य केले आहे. तसेच गणपती मंडळ हे देखील मंडपातील हौदात गणपतीचे विसर्जन करणार आहे. कोणालाही विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी राहणार नाही. मंडपातील हौदात विसर्जन करताना फक्त मंडळाचे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यावेळी त्यांना सुरक्षित अंतराचे नियम पाळावे लागणार आहेत. मानाच्या गणपतीच्या विसर्जनाला गर्दी होण्याची शक्यता वाटली तर शिवाजी रस्त्यावरील वाहतूक देखील काही वेळ वळविण्यात येणार आहे.

पुणे शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या चार रस्त्यावर यंदा बंदोबस्त राहणार नाही. तरीही नागरिकांनी दर्शनासाठी बाहेर पडू नये म्हणून ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

सात हजार पोलिस, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, एसआरपीची कंपनी बंदोबस्तमध्ये असेल. कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत नागरिक व मंडळांनी पूर्ण उत्सवामध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. तसेच, नियमांचे पालन केले. विसर्जनाच्या दिवशी देखील अनेक मंडळे त्यांच्या मंडळाचे विसर्जन हे ऑनलाईन दाखविणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडून गर्दी करू नये, असे आवाहन सहआयुक्त डॉ. शिसवे यांनी केले आहे.

उपनगर परिसरातल्या मंडळांनी प्रशासनास चांगले सहकार्य केले आहे. त्या भागातील मंडळांसोबत अधिकारी संपर्कात आहेत. त्यांना देखील मंडपातच विसर्जन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, उपनगरातील घाट, नदी किनारी, तलाव या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

रात्री ११ पर्यंत सर्व मंडळांचे विसर्जन

प्रत्येक वर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक २४ तासांपेक्षा जास्त चालते. यंदा करोनाच्या पार्श्वभुमीवर विसर्जन मिरवणुकींना बंदी आहे. त्यामुळे मंडपातच श्री चे विसर्जन असेल. शहरात सकाळी ११ वाजल्यापासून मानाच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होईल. क्रमाने मानाच्या गणपतीचे विसर्जन होईल. रात्री अकरापर्यंत शहरातील गणपतीचे विसर्जन झाले असेल. पहिल्यांदाच विसर्जन लवकर होईल. त्यामुळे यंदा पोलिसांना दरवर्षी पेक्षा खूपच कमी बंदोबस्त करावा लागणार आहे.