दौंडमध्ये बारामतीच्या क्राईम ब्रँचची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई, वाळू माफियांच्या 2.5 कोटींच्या 31 बोटी, 6 ट्रक आणि 3 जेसीबी मशीन जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील शिरापूर – हिंगणी येथे भीमा नदी पात्रामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपश्यावर बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने धाड टाकून सुमारे 2 कोटी 43 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 31 बोटी, 6 वाळूने भरलेले ट्रक आणि 3 JCB मशीनचा समावेश आहे.

बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाला दौंडमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिक बोटी आणि जेसीबी मशीनने वाळू उपसा होत असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने वरील पथकाने शिरापूर हिंगणी येथे धाड टाकली असता त्यावेळी सदरील यांत्रिक बोटीने वाळू उपसा करून तो JCB आणि इतर यंत्रांच्या साहाय्याने ट्रक मध्ये भरून चोरी करत असताना मिळून आले.

भीमा नदी पात्रात आरोपी हे वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही लिलाव करण्यात आला नसताना बेकायदेशीर पणे यांत्रिक बोटीने वाळू उपसा करून जेसीबी आणि इतर यंत्रांच्या साहाय्याने ट्रक मध्ये भरून चोरी करत होते त्यावेळी त्यांना पकडण्यात आले. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस, अधीक्षक आय. पी. एस. जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लंगुटे, बारामती क्राईम ब्रांचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 15 पुरुष 5 महिला पोलीस जवान यांनी केली.

सदर कारवाई कामी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सपोनि अजय अधिकारी, दौंड पोलिस स्टेशनचे अझीझ शेख, गाढवे, थोरात, रमेश काळे भिगवण पोलिस स्टेशनचे पोलीस जवान हेमंत जाधव, सचिन शिंदे, काळभोर यांनी मदत केली तसेच महसूल पथकाचे मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी या कारवाईत मदत केली. सदर जप्त बोटी महसूल विभागाच्या पथकाच्या मदतीने फोडण्यात आल्या आहेत.