Pune : 44 लॅपटॉप घेऊन आयटी कंपनीची 21 लाख रूपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आयटी कंपनीचे लॅपटॉप तसेच इतर साहित्य भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपनीची 44 लॅपटॉप घेऊन ते परत न देता व त्याचे भाडे न देता फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 21 लाख रुपयांची यात फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी महेश त्रिंबक पातुरकर (वय ५२, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संदेश रणावरे (रा. कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा आयटी कंपनीला लागणारे साहित्य भाडे तत्वावर देण्याचा तसेच विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान यातील संदेश याची देखील कंपनी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने फिर्यादी यांच्याकडे भाड्यावर लॅपटॉप भाड्यावर मागितले होते. त्यानुसार त्याला 44 लॅपटॉप दिले. भाडे निश्चित करण्यात आले होते. हे लॅपटॉप 17 लाख रुपयांचे होते. तर त्याचे भाडे 5 लाख 22 हजार रुपये झाले होते. मात्र त्याने भाडे दिले नाही. तसेच लॅपटॉपही परत न करता त्यांची एकूण 21 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान त्याने पैसे दिले नाही. तसेच पैसे मागितले असता दोन चेक दिले. ते वटले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. हा सर्व प्रकार 2 ऑक्टोबर 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत घडला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.