लग्नात मुंबईचा पाहुणा आल्यानं अनेकांना ‘कोरोना’ची लागण, वधू-वरांच्या वडिलांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धालेवाडी इथे शेकडो लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्यात आला. या सोहळ्याला तब्बल 400 च्या आसपास लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्यात एक कोरोनाबाधित पाहुणा हजर झाल्याने नवरा-नवरीसह अनेकांना कोरोना विषाणूची लागण झाली.

तसेच विवाह सोहळ्यानंतर रात्री वरात काढली. तिथे अनेक लोक उपस्थित होते. त्यामुळे अखेर या सोहळ्याप्रकरणी मंगल कार्यालय मालक, वर आणि वधू पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनासमुळे संपूर्ण राज्यासह देशावर मोठे संकट ओढावले आहे. यामुळे शासन, प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विविध निर्बंध लावले आहेत. मात्र, काही लोक हे सर्व नियम-अटी बाजूला सारताना आढळतात. हे नियम तोडने पुणे जिल्ह्यातील काही लोकांना महागात पडले आहे.

लॉकडाऊन असताना 29 जूनला हा विवाह सोहळा जुन्नरनजीकच्या एका मंगल कार्यालयात पार पडला होता. या विवाह सोहळ्याला जुन्नरचे आमदार, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष, यासोबत परिसरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील 400 पेक्षा अधिक मंडळी उपस्थित होते. तालुक्यातील धालेवाडी येथील वधू आणि हिवरे बुद्रुक येथील वर यांचे या सोहळ्यात लग्न होते.

मुंबईचा एक कोरोना पॉझिटिव्ह पाहुणा लग्न सोहळ्यात उपस्थित राहिला आणि त्याने विवाह सोहळ्यातील नवरा-नवरीसह अनेकांना कोरोनाबाधित केले. लग्नानंतर रात्री वरात काढण्यात आली. नवरा-नवरी कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समजले. येथील लग्न सोहळ्यासाठी आलेला पाहुणे, कार्यमालक, वऱ्हाडी आणि पाठोपाठ नवरा-नवरी कोरोनाबाधित निघल्याने हा विवाह सोहळा चर्चेत आला आहे.