Pune : सिक्युरिटी गार्डचा ड्रेस घालून ATM सेंटरमधील बॅटर्‍या चोरणार्‍याला खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिक्युरीटीचा ड्रेस घालुन एटीएम केंद्रातील बॅटऱ्या चोरणाऱ्या सराईत टोळीला खडक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

भगवान विश्वनाथ सदार (वय ३८, रा.फ्लॅट नं ३०२, गणराज हाईटर्स तिसरा माणा, पिंपळे गुरव, मुळ रा.मुपो चतारी ता.पातुर जि.अकोला) व जगदीश जगदेव हिवराळे (वय ३०, रा.मुपोपो बाळापुर नवानगर युद मंदीर गवळ जि. अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जानेवारी महिन्यात पहाटे शिवाजी रोडवरील शाह चौकात असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रात घुसून दोघांनी एक्साईड कंपनीच्या 8 बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास खडक पोलिसांचे डीबी पथक करत होते. यावेळी सीसीटीव्ही तपासले असता दोघे सिक्युरिटी गार्डला असणारे कपडे घालून आल्याचे दिसून आले होते. त्यांचा शोध घेत असताना कर्मचारी बंटी कांबळे व समीर माळवदकर याांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येथुन बॅटरी चोरणारे दोघे त्रिकोणी गार्डन घोरपडे पेठ येथे थांबले आहेत. याची खातरजमा करण्यात आली.

यानुसार परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुशिल बोबडे, उपनिरीक्षक रविकांत कोळी, कर्मचारी समीर माळवदकर, बंटी कांबळे, संदिप पाटील, अमेय रसाळ, रवी लोखंडे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केलेल्या कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी व इतर साहित्य असा 2 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सदार हा पूर्वी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. यामुळे त्याला एटीएममध्ये बॅटरी कोठे असते आणि कशी काढली जाते याची पूर्ण माहिती होती. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीचे 16 गुन्हे दाखल आहेत. पुण्यासह इतर शहरात गुन्हे दाखल आहेत.