Pune Metro Project : कामगार पुतळा झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया 4 ते 8 जून दरम्यान पुर्ण करणार; नवीन सदनिका नोंदणीसाठी उपस्थित न राहाणार्‍या पात्र झोपडीधारकाचा हक्क संपुष्टात येणार – राजेंद्र निंबाळकर (सीईओ, एसआरए)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील (Slum) नागरिकांचे हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. २४ मे पासून सुरू झालेली ही प्रक्रिया ८ जून पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. पुनर्वसन करण्यात आलेल्या झोपडपट्टी (Slum) धारकांच्या नवीन सदनिकांच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडील नोंदणीचे काम ४ ते ८ जून दरम्यान (शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवसांसह) करण्यात येणार असल्याची माहिती एसआरएचे सीईओ राजेंद्र निंबाळकर यांनी कळविले आहे.

HSC Bord Exam : बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाचं झालं एकमत

महामेट्रोच्यावतीने शिवाजीनगर न्यायालयासमोरील कामगार पुतळा व राजीव गांधीनगर वसाहतीच्या जागेवर मेट्रोचे मुख्य स्टेशन उभारण्यात येणार आहे.
येथील नागरिकांचे पुनर्वसन हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पांमध्ये करण्यात आले आहे.
२४ मे पासून प्रत्यक्षात स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुनर्वसन केलेल्या नागरिकांना देण्यात येणार्‍या सदनिकांचे दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
२८ मे पर्यंत १५५ सदनिकांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे.
उर्वरीत सदनिकाधारकांच्या नोंदणीचे काम ४ जून ते ८ जून दरम्यान करण्यात येणार आहे.
या कालावधीत शनिवार व रविवारची शासकिय सुट्टी असली तरी ही प्रक्रिया सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जिल्हाधिकारी कार्यालय, एरंडवणे आणि दापोडी येथील कार्यालयात करण्यात येणार आहे.
याठिकाणी प्रथम उपस्थित राहाणार्‍या सदनिकाधारकांचे सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यान नोंदणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
प्रत्येक सदनिकाधारकांना टोकन देण्यात येणार असून वेळापत्रकानुसार पात्र झोपडीधारक, त्याच्यासोबत सह हक्कदार/ वारस अशा केवळ दोन व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार आहे.
येताना आधारकार्ड व सूचनापत्र आणणे बंधनकारक राहाणार आहे.

पुनर्वसन झालेल्या झोपडीधारकाने त्याची सध्याची झोपडी रिकामी करून सर्व घरगुती साहित्य ७ जून ते १० जून दरम्यान घेउन जावे.
यासाठी येणार्‍या खर्चाचे ४ हजार रुपये झोपडीधारकाला देण्यात येणार आहेत.
वरिल नोंदणीच्या दिवशी उपस्थित न राहाणार्‍या तसेच नवीन सदनिकेचा ताबा न घेणारा झोपडीधारक सदनिका स्वीकारण्यास इच्छुक नाही असे समजून सदनिका रद्द करण्यात येईल.
तसेच झोपडी निष्कासनाची कारवाई देखिल करण्यात येईल, असे एसआरएचे सीईओ राजेंद्र निंबाळकर यांनी कळविले आहे.