आमदार अनिल भोसलेंच्या अडचणीत वाढ; बँकेत आणखी 81 कोटींचा घोटाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले सहकारी बँक अर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असणारे आमदार अनिल भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बँकेच्या 71 कोटींच्या घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात फसवणूकीच्या रक्कमेत वाढ झाली असून, त्यात आणखी 81 कोटींचे गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फसवणूकीचा आकडा 153 कोटींवर गेला आहे, असे अर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

आमदार अनिल शिवजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता ) सुर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरु पार्क), तानाजी दत्तु पडवळ (वय ५० रा. तापकीरनगर, काळेवाडी) आणि शैलेश संपतराव भोसले (वय ४७ रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर ) यांना अटक केली आहे. याप्रकरणी योगेश लकडे (वय ३९, रा. आंबेगाव नऱ्हे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १६ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी भोसले यांच्यासह चौघांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडी आहेेेत.

आमदार भोसले हे बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना, जाधव संचालक होते. तसेच पडवळ हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बँकेचे मुख्य हिशोब तपासणीस होते.

बँकेत ठेवींचा अपहार झाल्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लेखापरिक्षकाना बँकेच्या रोख शिल्लक रक्कम बाबत पडताळणी करण्यासाठी सांगितले होते. यावेळी बँकेकडे ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखविल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखलकरून त्याचा तपास अर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. यानंतर अनिल भोसले व इतरांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तपास करत असताना कर्जप्रकरणात आणखी ८० कोटींची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यात आणखी एका संचालक आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तसेच, बँकेत रकमेचा गैरव्यवहारनअंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या अर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले होते. तर एका ग्राहकास केवळ १ हजार रूपये काढण्याचा अधिकार दिले होते. मात्र, निर्बंधनंतर देखील दीड कोटी रूपयांची रक्कम काढण्यात आल्याचे आढळून आले आहे.

ऑडिटर कंपनीची चौकशी होणार…
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ठेवी, कर्ज प्रकरण आदीचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी नेमललेल्या ऑडिटर कंपनीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीचे धाबेदणाणले आहेत