पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यात पुन्हा थंडी अवतरणार; ‘या’ हंगामातील शेवटचा ‘गारवा’ अनुभवण्यास मिळणार

पुणे : सध्या सातत्याने हवामानात बदल होत असून येते. ३ दिवस पुन्हा राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे या समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये किमान तापमान १५ – १६ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक येथील तापमानाही या हंगामातील सर्वात कमी नोंदविले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षे जसे कोरोनामुळे अस्थिर राहिले. तसेच हवामानातील बदलामुळे लांबलेला पावसाळा, ऐन थंडीत उकाडा अन पाऊस यंदा अनुभवायला मिळाला. त्यातच थंडीच्या हंगामात यंदा सलग थंडी पडलेली नाही. आता पुन्हा एकदा राज्यातील किमान तापमानात पुढील दोन ते तीन दिवस मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

पुण्यात सर्वात कमी किमान तापमान
राज्यात शनिवारी सकाळी पुण्यात सर्वात कमी किमान तापमान ११.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मुंबई १९.८, सांताक्रुझ १६.९, रत्नागिरी १७.६, डहाणु १७.५, जळगाव १३.७, पुणे ११.३, महाबळेश्वर १३, नाशिक १२, बारामती १३, उस्मानाबाद १५.४, सांगली १६.२, सोलापूर १५.८, सातारा १४.९, मालेगाव १३.२, ठाणे २०.२, कोल्हापूर १७.४, जेऊर १४, नांदेड १७, परभणी १५.९, जालना १४, औरंगाबाद १४.९, अमरावती ११.९, यवतमाळ १२.५, गडचिरोजी १३.६, नागपूर १७, अकोला १४.४, गोंदिया १४़ येत्या ४८ तासात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.