Pune : मुळशी तालुक्यात पुर्ववैमनस्यातून घरात घुसून तरूणाचा खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यात पूर्व वैमनस्यातून घरात घुसून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिंदेवाडी गडदावणे गावात हा प्रकार शनिवारी रात्री घडला आहे. तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अनिरुध्द शामराव पिलाणे (वय २५, रा. शिंदेवाडी गडदावणे, ता. मुळशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिरुद्ध यांची पत्नी रेश्मा पिलाणे (वय २२) यांनी पौड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अक्षय नथू शिंदे, सोन्या उर्फ राजेंद्र जयवंत मानकर, मोन्या उर्फ मनोज जयवंत मानकर (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीची आरोपींसोबत पूर्वी भांडणे झाली होती. त्यावेळी त्यांनी आरोपींना शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून शनिवारी रात्री आरोपी हे अनिरुद्ध पिलाणे याच्या घरात घुसले. तू आम्हाला शिवीगाळ का केली असे म्हणत त्याला काठीने व कोयत्याने डोक्यात, तोंडावर, छातीवर, हातावर वार केले. त्यावेळी फिर्यादी या भांडणे सोडविण्यास मध्ये आल्या. त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हातावर जखम झाली. तर, अनिरुद्ध पिलाणे हे आरोपींनी केलेल्या वारामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पसार असून त्यांचा शोध पौड पोलिसांकडून घेतला जात आहे.