Pune News : खंडणी विरोधी पथकाकडून 11 लाखाचे चरस जप्त, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   नाशिक मार्गे पुण्यात विक्री करण्यासाठी आणलेला चरस हा अंमली पदार्थ गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोन कडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 11 लाख 43 हजार रुपये किमतीचा 1 किलो 905 ग्रॅम चरस, महिद्रा एक्स यु.व्हीसह 16 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जुना पुणे मुंबई महामार्गावरील अंडी उबवणी केंद्र चौकात मंगळवारी (दि.9) दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली.

विरेंद्र घांथुराम शर्मा (वय-40 रा. मु.पो. जगतसुख, ता. मनाली, जि. कुल्लू, हिमाचल प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी खंडणी विरोधी पथकाकडून खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना प्रदिप गाडे यांना माहिती मिळाली की, एका महिंद्रा एक्स यु.व्ही (एची 58 6232) गाडीमधून एक व्यक्ती चरस विक्री करण्यासाठी नाशिक मार्गे पुण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंडी उबवणी केंद्र चौकात सापळा रचून गाडी अडवून चालकाकडे चौकशी केली. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील दरवाजाच्या वरील बाजूस असलेल्या टफच्या कुशनमध्ये एक निळ्या रंगाची कापडी पिशवी आढळली. त्यामध्ये प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेला काळपट रंगाचा 1 किलो 905 ग्रॅम चरस सापडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत चरस पुण्यात विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. पोलिसांनी चरस, गाडी, दोन मोबाईल असा एकूण 16 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण, सहाय्यक पोलीस फौजदार संपत औचरे, पोलीस अंमलदार विजय गुरव, राहुल उत्तरकर, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, प्रदिप गाडे, भूषण शेलार, मोहन येलपले, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.