Pune News : पुढील वर्षी एप्रिल पर्यंत 150 ई-बसेस PMP च्या ताफ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी पीएमपी (पुणे महानगर परिवहन महामंडळ) पुढील वर्षभरात म्हणजेच एप्रिल पर्यंत सुमारे 150 ई-बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. 55 लाख रुपय प्रति बस केंद्र सरकार देणार आहे. खासदार गिरीष बापट व पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परीषदेत या संदर्भात माहीती दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीचे संचालक सदस्य व नगरसेवक शंकर पवार यावेळी उपस्थित होते.

पीएमपीएल उत्पन्न वाढीचा प्रश्न, डेपो जागा, कामगार पगार प्रश्न, डीझेल वाढ आदी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे सांगतात बापट पुढे म्हणाले कि, पुण्याची वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेता पुण्याला 3000 बसेस ची आवश्यकता आहे. आता 2100 बसेस पुण्यात उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रीक व हायब्रीड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि तिची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून फेब -2 ही योजना सुरू केली आहे. योजनेतंर्गत 600 इलेक्‍ट्रिक बसेस पीएमपीला मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला गेला होता. त्यापैकी 150 बसेस घेण्याचा प्रस्तावाला केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. यामध्ये प्रत्येक बसला 55 लाख रुपये सबसिडी केंद्र सरकारकडून मिळणार आहे.

याबाबतची निविदा प्रक्रीया नुकतीच राबविण्यात आली होती. पहील्या निविदा प्रक्रियेत किफायतशीर दर न आल्याने फेरनिविदा काढण्यात आली. या फेरनिविदेत ईव्हीईवाय ट्रान्स प्रा. लि. यांची निविदा पात्र झाली व त्यांच्याशी चर्चा करून प्रति किलोमीटर 63 रुपये 95 पैसे प्रति किलोमीटर दराने ई बस घेण्यात येणार आहे. त्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. सदर कंपनीला 150 ई-बसेसची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. एप्रिल महीन्यापासून या बसेस पीएमपीला मिळण्यास सुरवात होईल. डिसेंबर अखेर 150 बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील असा दावा बापट व जगताप यांनी केला.

पेठांमध्ये दहा रुपयात दिवसभर फिरा ‘अभय’ योजना

या पत्रकार परीषदेत स्थायी समितीचे अध्यक्ष रासने यांनी पुणे महापालिका 25 कोटी रुपये खर्च करून 50 ते 60 मिडी बसेस खरेदी करणार आहे. या बसेस 9 मीटर लांबीच्या असुन, यामध्ये साधारण 26 ते 28 प्रवासी बसु शकतात. तर दहा ते पंधरा प्रवासी उभे राहु शकतात. याबसेसच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागात पीएमपीची सेवा केवळ दहा रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे. दहा रुपयांचे तिकीट काढल्यानंतर प्रवासी या पेठांच्या भागात दिवसभर पीएमपीमधून प्रवास करू शकणार आहेत. ही योजना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे रासने यांनी सांगितले.

आकडेवारी

– नवीन करारानुसार घेण्यात येणाऱ्या 150 बसमधील प्रत्येक बस ही प्रतिदिन 225 किमी धावेल.

– दिडशे पैकी 90 बसेस या पुणे महापालिकेच्या हद्दीत तर 60 बसेस या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मार्गावर धावतील.

– यापुर्वी 2018-19 मध्ये 150 ई बसेस भाडेतत्वावर घेतल्या गेल्या. यावर्षाखेर आणखी 150 बसेस ताफ्यात आल्यानंतर ई बसेसची संख्या 300 होणार.

– 12 मीटर लांबीच्या बीआरटी 350 ई-बसेस भाड्याने घेण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात.