Pune News : पुण्याच्या बिबवेवाडीत 5.77 लाखांचा 22 किलो गांजाचा साठा जप्त, उस्मानाबाद येथील एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवर पोत्यात गांजा घेऊन तो विक्री करण्यास आलेल्या एकाला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 22 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. निसार मोदीन जमादार (वय 25, रा. लोणी काळभोर, मूळ. जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगार यांची माहिती काढली जात आहे. त्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. या दरम्यान बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर व त्यांचे कर्मचारी हे हद्दीत मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आई माता मंदिर परिसरातील गोयल गार्डन समोर एकजण दुचाकीवर गोणी घेऊन थांबलेला असल्याचे दिसून आले. संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्याला पाठलाग करून पकडले व पोत्यात काय याची माहिती विचारली. यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याच्याकडून 22 किलो 44 ग्रॅम असा 5 लाख 77 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता त्याने गांजा कोठून आणला व तो कोणाला विक्री करणार होता, याची माहिती घेतली जात आहे.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे, सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर, शाम लोहोमकर, अमित पुजारी, सतीश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.