Pune News : गॅस पाईप दुरुस्तीचे काम करताना अचानक लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एमएनजीएल गॅस पाईप दुरुस्तीचे काम करताना अचानक लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी (दि. 24 डिसेंबर) बाणेर येथील ऑर्चीड टॉवर सोसायटीत हा प्रकार घडला होता. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित प्रशांतकुमार प्रसाद (वय 19) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कुशल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सतीश देशमुख व आर. जे. इंटरप्राईजेसच्या जितेंद्र रामचंद्रन कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत मुलाचे वडील प्रशांत कुमार कामता प्रसाद (वय 41) यांनी चतु: शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील ऑर्चिड टावर या सोसायटीत गॅस पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या साइटवर अमित प्रसाद हा काम करत होता. यावेळी काम करत असताना गॅस पाईपने अचानक पेट घेतला आणि आग लागली. आगीत अमित भाजला होता. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना 30 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कामाचे वेळी निष्काळजीपणा व बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत अमितच्या मृत्यूला जबाबदार धरत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.