Pune News : आयुर्वेदीय उपचार सर्वकाळ परिणामकारक – उल्हास पवार

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ”आयुर्वेद औषधांच्या वापरातून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती आज जगमान्य झाली आहे. आयुर्वेदामुळे कोणताही अपाय होत नाही; तर त्याने आजारांवर उपाय होत आहे. बदलत्या जीवनशैली मुळे अनेक आजारांचा सामना करताना पारंपरिक आयुर्वेद शास्त्र उपचारासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणपूरक, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी,” असे मत जेष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.

श्री. विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर यांच्या वतीने श्री. विश्ववती चिकित्सालयाचे अध्यक्ष श्री. निरंजन सांगवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना श्री. सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री आनंदनाथजी सांगवडेकर यांच्या प्रेरणेतून संशोधित झालेल्या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘रस माधव वटी’चे मोफत वितरण करण्यात आले. प्रसंगी प्रख्यात वैद्य समीर जमदग्नि, महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ राज्यसचिव शिवाजी खांडेकर, नगर रचना महाराष्ट्र निवृत्त संचालक राजन कोप, रावसाहेब पटवर्धन विद्यालयाच्या मुख्यध्यापिका वृंदा हजारे, राष्ट्रसेवा दल संचालित शिक्षण प्रसारक मंडळ सचिव वर्षा गुप्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही शाळांना औषध वितरण करण्यात आले. श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रतील संशोधनाच्या टीममधील सदस्य वैद्य प्रसाद पांडकर, वैद्य शैलेश मालेकर, वैद्य गिरीश शिर्के, वैद्य सागर कवारे, वैद्य तुषार सौंदाणकर आदी उपस्थित होते. पुणे जिल्हातील सात हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.

उल्हास पवार म्हणाले, “कोरोना महामारीचा प्रतिकार करण्यासाठी संशोधन केंद्राने बनवलेले औषध उपयुक्त आहे. प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने या गोळ्याना महत्त्व आहे. डॉक्टरांनी करुणा, सहानभूतीच्या भावनेने काम करावे.” राजन कोप, वर्षा गुप्ते यांनीही मनोगते व्यक्त केली. वृंदा हजारे यांनी प्रास्ताविक केले. वैद्य गिरीश शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. प्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने गदिमा जीवनगौरव सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल उल्हास पवार यांचा सत्कार करण्यात आला.