Pune News : पोलिसांच्याच डोक्यात फोडली बिअरची बाटली; दारु दुकान बंद असल्याचे समजावणार्‍या पोलिसावर हल्ला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  दारुचे दुकान बंद असल्याचे सांगितल्यावरही वाद घालणार्‍यांना समजावणार्‍या पोलीस शिपायाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना जखमी करण्याचा प्रकार हडपसरमध्ये घडला.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ओंकार ऊर्फ बंटी काकडे (रा. महादेवनगर, हडपसर) आणि आश्विन ऊर्फ भाऊ पडघमकर ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी रवि रतन राठोड (वय २८, रा. चिंतामणी पार्क, मांजरी) या पोलीस शिपायांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मयूर पिया बिअर शॉपीसमोर १७ मार्च ला रात्री अकरा वाजता घडला. राठोड हे ड्युटी संपवून दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे अबा साले यांच्याशी दोघे जण वाद घालत असल्याचे दिसले. म्हणून तेथे काय चालले आहे, हे पाहण्यासाठी राठोड गेले. ते दारु मागण्यावरुन भांडणे करीत होते. तेव्हा राठोड यांनी दारुचे दुकान बंद आहे. तुम्ही हे चुकीचे करताय असे समजावून सांगत असताना ओंकार काकडे याने तू कोण आहेस बोलणारा असे बोलून शिवीगाळ करुन राठोड यांना हाताने मारहाण केली. त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. त्यानंतर ते पळून गेले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.